
विशेष प्रतिनिधी | मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या Brihanmumbai Municipal Corporation ‘एच/ई’ प्रभागातील (H/E Ward) भोंगळ, निष्काळजी आणि संशयास्पद कारभाराचा आणखी एक धक्कादायक नमुना खार (पूर्व) परिसरात समोर आला आहे. वॉर्ड क्रमांक ९४ मधील जवाहर नगर मेन स्टेशन रोडवर, रमेश क्लॉथ स्टोअर समोरील मुख्य रस्त्यावर गटार सफाईच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पालिकेने चार दिवसांपूर्वी गटार साफ करण्याची मोहीम राबवली खरी; मात्र गटारातून काढलेला काळाकुट्ट, दुर्गंधीयुक्त गाळ आणि कचरा रस्त्याच्या कडेलाच टाकून देण्यात आला आणि त्यानंतर प्रशासनाने अक्षरशः त्या भागाकडे पाठ फिरवली. चार दिवस उलटून गेले तरी तो कचरा उचलण्यासाठी ना कंत्राटदार आला, ना पालिकेचा एकही कर्मचारी फिरकला.
सध्या संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून डास, माश्या आणि रोगराईचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा तोंडावर असताना अशा प्रकारे सडणारा कचरा रस्त्यावर टाकून ठेवणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
“काम फक्त कागदावर, पैसा मात्र पूर्ण?”
स्थानिक नागरिकांनी गंभीर आरोप करत सांगितले की, काही कंत्राटदार हे फक्त बिल काढण्यासाठी आणि पालिकेचा निधी लाटण्यासाठी काम करत आहेत. गटर सफाईचे फोटो काढले जातात, फाईल पूर्ण दाखवली जाते, पण प्रत्यक्षात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग कायम राहतात.
“जर गटारातील गाळ उचललाच नाही, तर सफाईचा उपयोग तरी काय? हा सर्व प्रकार म्हणजे उघड भ्रष्टाचार नाही का?” असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांच्या मते, संबंधित कंत्राटदार आणि काही अधिकारी यांच्या संगनमतामुळे हा प्रकार सुरू असून, जनतेच्या कराच्या पैशांची खुलेआम उधळपट्टी होत आहे. “पालिका फक्त कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी काम करते का?” असा संतापजनक प्रश्न आता परिसरातून विचारला जात आहे.
मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य; अपघाताचा धोका
जवाहर नगर मेन स्टेशन रोड हा खार (पूर्व) परिसरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. दररोज हजारो नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला आणि वाहनचालक या रस्त्याने प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक दुकानदारांचेही मोठे नुकसान होत आहे. दुर्गंधीमुळे ग्राहक येण्यास टाळाटाळ करत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नगरसेवक आणि अधिकारी ‘एसी ऑफिस’पुरतेच मर्यादित?
चार दिवसांपासून मुख्य रस्त्यावर कचरा सडत असताना स्थानिक नगरसेवक, विभाग अधिकारी किंवा आरोग्य विभागातील कोणीही घटनास्थळी फिरकले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
“निवडणुकीत मत मागताना गल्ली-गल्ली फिरणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गायब झाले? नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत असताना नगरसेवक एसी केबिनमध्ये बसून नेमके काय करत आहेत?” असा संतप्त सवाल स्थानिकांनी केला आहे.
‘एच/ई’ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन चौकशी करावी, दोषींना काळ्या यादीत टाकावे आणि या भ्रष्ट कारभारावर कायमस्वरूपी लगाम घालावा.