
मुंबई प्रतिनिधी प्रीती गडा
मुंबई : बांद्रा (पूर्व) येथील राजीव गांधी गरीब नगर परिसरात अवैध बांगलादेशी घुसखोरांविरोधात प्रशासन आणि पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर मेगा हंट ड्राइव्ह आणि डेमोलिशन ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. 19 मे 2026 ते 23 मे 2026 या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून संपूर्ण परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी केली आहे. सुमारे 400 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून परिसरातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अवैध बांधकामांवर कारवाई करण्यासाठी जवळपास 10 जेसीबी आणि बुलडोजर सज्ज ठेवण्यात आले आहेत.
आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन 25 रुग्णवाहिका स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आहेत, तर अग्निशमन दलाच्या विशेष पथकांनाही घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. प्रमुख रस्त्यांवर वाहतूक नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारण्यात आले असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करताना सांगितले की, 19 मे ते 23 मे दरम्यान रेल्वे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. तसेच अफवा पसरवू नयेत आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या या संयुक्त कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील काही दिवस संपूर्ण भागात कडक सुरक्षा व्यवस्था कायम राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.