घरफोडी चोरी प्रकरणी पालघर पोलिसांचे यश – आरोपी अटकेत, ३४ गुन्ह्यांतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पालघर, दि. १७ नोव्हेंबर २०२५ :
पालघर शहरातील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बाजारात गेलेल्या दांपत्याच्या घराचा दरवाजा तोडून ९२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेलेल्या प्रकरणी, पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीस अटक केली आहे.

सदर घटना १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ११ ते १ वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादी श्री. मनोज अशोक कापडिया (वय ४४, रा. शेवंती अपार्टमेंट, पालघर) हे आपल्या पत्नीसमवेत बाजारात गेले असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून कपाटातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, चैन आणि हार असा एकूण ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला नेला होता. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६७/२०२५ भा.दं.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (३) अंतर्गत दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी निलेश अंकुश काळे (वय ५८, व्यवसाय – भाजी विक्री, रा. दत्तराज चाळ, भाटपाडा, विरार पूर्व) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सदर घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर वाडा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. ३३५/२०२५ मध्येही त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

महत्त्वाचे म्हणजे निलेश काळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा आणि मुंबई परिसरात त्याच्याविरोधात एकूण ३४ गुन्हे दाखल आहेत.

या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे यांचे मार्गदर्शन लाभले. कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप पाटील, पोउनि स्वप्नील सायंतदेसाई, पोहवा संतोष निकोळे, संदिप सरदार, भगवान आव्हाड, राकेश पाटील, पोअमं विशाल लोहार, विशाल कडव, वैभव जामदार (स्थानिक गुन्हे शाखा, पालघर), तसेच पोना भुषण वाघमारे, पोअमं रुपेश पाटील (सायबर पोलीस ठाणे पालघर) आणि मपोअमं राखी मेस्त्री (सीसीटीएनएस, पालघर) यांनी मोलाचा सहभाग नोंदविला.

One thought on “घरफोडी चोरी प्रकरणी पालघर पोलिसांचे यश – आरोपी अटकेत, ३४ गुन्ह्यांतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button