मेंढवन घाटात भीषण अपघात; वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलांचे प्राण वाचले

पालघर : काल दुपारी सुमारे ४.०० वाजताच्या सुमारास पालघर-चारोटी मार्गावरील मेंढवन घाट येथे एक भीषण अपघात घडला. वाहतूक शाखेचे पोलिस अमलदार पी.सी. देशमुख हे बाइक पेट्रोलिंग करत असताना हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये अचानक एक गाय आल्याने कार क्रमांक MH01EN0102 चालकाने अचानक ब्रेक लावले. यामुळे पाठीमागून येणारी लक्झरी बस (क्रमांक MP44ZB6776) कारवर जोरात आदळली. धडकेनंतर कार नियंत्रणाबाहेर जाऊन विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन पलटी झाली.
या अपघातात कारमधील दोन महिलांना दुखापत झाली असून त्यापैकी एक महिला गंभीर जखमी झाली, तर दुसऱ्या महिलेला किरकोळ मार लागला. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस अमलदार पी.सी. देशमुख यांनी तत्काळ धाव घेत जखमी महिलांना मदत केली. त्यांनी कोणताही वेळ न दवडता जखमींना खाजगी वाहनाच्या मदतीने पुढील उपचारासाठी मुंबईकडे रवाना केले, ज्यामुळे त्यांच्या प्राणांची रक्षा झाली.
तसेच, अपघातग्रस्त वाहन खाजगी क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या वेळी देशमुख यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत वाहतूक कोंडी होऊ दिली नाही.
वाहतूक पोलिसांच्या या तत्पर आणि धाडसी कार्यामुळे स्थानिक नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या सेवाभावी कार्यामुळे पोलिस दलाविषयीचा विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button