पालघर पोलिसांची मोठी कारवाई : अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींना अटक

पालघर (प्रतिनिधी) : अमली पदार्थांच्या विरोधात कडक भूमिका घेत पालघर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात कठोर मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दिनांक ०३ मे २०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, माकणे-पंडितपाडा परिसरातील साई सिद्धी बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर “ब्राउन शुगर” या अमली पदार्थाची विक्री करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सफाळे पोलिसांनी तात्काळ छापा टाकत दोन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून सुमारे २२४.६९ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ, रोख रक्कम, पॅकिंग साहित्य आणि मोबाईल असा एकूण सुमारे ४६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास सुरू असून अमली पदार्थांच्या जाळ्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button