
पालघर, दि. ०७ मे २०२६ : युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून पालघर जिल्हा (पालघर व डहाणू विधानसभा क्षेत्र) येथील नव्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील युवासेना संघटनेला नवसंजीवनी मिळणार असल्याचे मानले जात आहे.
जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार साईराज कल्पक पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून चेतन राजेंद्र धानमेहेर यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कुमार हेमंत माळी (जिल्हा निरीक्षक), हितेश शंकर पाटील व भावेश विजय धामनकर (जिल्हा उपाध्यक्ष), अवदित सिंघ (विधानसभा अध्यक्ष), उदय बाबुराव अधिकारी (तालुका अध्यक्ष) आणि प्रफुल्ल रमेश पाटील (शहर अध्यक्ष) यांच्यासह इतर अनेक पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.
या नियुक्त्यांमुळे पालघर व डहाणू विधानसभा क्षेत्रात युवासेनेचे संघटन अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांवर स्थानिक पातळीवर संघटन वाढवणे, युवकांना जोडणे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
युवासेना नेतृत्वाने दिलेल्या सूचनांनुसार पुढील १५ दिवसांत नवीन बांधणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून सदस्य नोंदणी व मतदार यादी प्रक्रियेबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात युवासेना अधिक सक्रिय होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
