खार (पूर्व) वॉर्ड ९४ मध्ये गटार तुंबल्याने नागरिक संतप्त; बीएमसीच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य धोक्यात

मुंबई | प्रतिनिधी प्रीती गडा
खार (पूर्व) येथील जवाहर नगर मेन रोड, वॉर्ड क्रमांक ९४ मध्ये गटार तुंबल्यामुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः दुर्गंधीत अडकले आहे. गटारातील घाण पाणी थेट मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एकीकडे बृहन्मुंबई महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि विकासकामांचे मोठमोठे दावे करत असताना, दुसरीकडे खार (पूर्व) येथील ही भयावह परिस्थिती पालिकेच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
जुनं गटार तोडलं, पण नवीन काम अर्धवटच!
स्थानिकांच्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये बीएमसीने खार (पूर्व) परिसरातील अनेक जुन्या गटारांचे काम करून नवीन गटारे बांधली. मात्र, जवाहर नगर मेन रोडवरील अत्यंत महत्त्वाच्या गटाराचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. जुने गटार तोडण्यात आले, पण नवीन गटाराची पूर्ण बांधणी न झाल्याने सांडपाण्याचा निचरा पूर्णपणे बंद झाला आहे.
परिणामी, गटारातील घाण पाणी थेट रस्त्यावर वाहत असून नागरिकांना दररोज नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.
अतिक्रमणामुळे सफाई ठप्प
गटारांवर झालेली टपऱ्या, छोटे दुकाने आणि अतिक्रमणे ही समस्या अधिक गंभीर बनवत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांना नियमित साफसफाई करणे अशक्य होत असल्याने गटारे दिवसेंदिवस अधिक तुंबत चालली आहेत. थोडासा पाऊस पडला तरी संपूर्ण रस्ता घाण पाण्याने भरून जात असल्याचे नागरिक सांगतात.
व्यापाऱ्यांचा संताप
परिसरातील दुकानदारांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एका व्यापाऱ्याने संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले,
“रोज दुकानासमोर गटाराचे पाणी येते. दुर्गंधीमुळे ग्राहक परत जातात. अनेक वेळा तक्रारी केल्या, पण अधिकारी फक्त पाहणी करून निघून जातात. प्रत्यक्षात कोणतेही काम होत नाही.”
H/E वॉर्ड आणि ठेकेदारांवर प्रश्नचिन्ह
स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, बीएमसी H/E वॉर्ड कार्यालय आणि महाराष्ट्र शासनाकडून या कामासाठी निधी मंजूर झाला असताना अद्याप गटाराचे काम पूर्ण का झाले नाही? संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही?
नागरिकांच्या मते, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येत्या पावसाळ्यात परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.
आरोग्याचा गंभीर प्रश्न
रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक रहिवाशांनी तात्काळ नवीन गटार बांधकाम पूर्ण करून संपूर्ण साफसफाई मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.
आता प्रश्न एकच —
पावसाळ्यापूर्वी बीएमसी जागी होणार की नागरिकांना पुन्हा एकदा घाण पाण्यातच जगावे लागणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button