पालघर नगरपरिषदेचा ‘कचरा’ कारभार! जागोजागी कचऱ्याचे ढीग, आरोग्य अधिकारी सुस्त; जिल्हाधिकारी-मुख्याधिकारी दखल घेणार का?

पालघर | विशेष प्रतिनिधी
एकीकडे शासकीय पातळीवर ‘स्वच्छ भारत अभियानाचा’ मोठा गाजावाजा केला जात असताना, दुसरीकडे पालघर नगरपरिषद हद्दीत मात्र या अभियानाचा पुरता बुरखा फाटला आहे. पालघर शहरातील जागोजागांवर कचऱ्याचे प्रचंड साठे साचले असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तक्रारींची केराची टोपली; आरोग्य अधिकारी सुस्त!
शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि रहिवासी भागांत कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, ज्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या गंभीर परिस्थितीबाबत अनेक सामान्य नागरिक, सजग पत्रकार आणि स्थानिक समाजसेवकांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, या तक्रारींची साधी दखल घेण्याची तसदीही आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही.
“आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे मनमौजी आणि बेजबाबदार पद्धतीने सुरू आहे. तक्रार करायला गेल्यावर फक्त आश्वासने दिली जातात, प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे. अधिकाऱ्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही का?” — संतप्त पालघरकर
कारभार पूर्णपणे ‘मनमौजी’!
नगरपरिषदेच्या आरोग्य विभागावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहेत, तरीही संबंधित अधिकारी कार्यालयात सुस्त बसून आहेत. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवत या अधिकाऱ्यांनी आपला ‘मनमौजी’ कारभार सुरू ठेवला आहे.
सफाई कामगारांच्या जिवाशी खेळ! सुरक्षेचा पत्ताच नाही
एकीकडे शहर कचऱ्याच्या विळख्यात अडकले असताना, दुसरीकडे कचरा आणि गटारे साफ करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. भर पावसात किंवा दूषित पाण्यात उतरून काम करणाऱ्या सफाई कामगारांकडे साधे हातमोजे (ग्लोज) आणि पायात गमबूट यांसारखी अत्यावश्यक सुरक्षा साधनेही उपलब्ध नाहीत.
अत्यंत असुरक्षित वातावरणात, उघड्या हाता-पायांनी हे कामगार घाणीत उतरून काम करत आहेत. “अशा परिस्थितीत काम करताना जर एखाद्या कामगाराला संसर्ग झाला किंवा त्याच्या जिवाला काही बरे-वाईट झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? नगरपरिषद प्रशासन की सुस्त बसलेले आरोग्य अधिकारी?” असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून विचारला जात आहे.
जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी लक्ष घालणार का?
आरोग्य अधिकाऱ्यांच्या या कामचुकार आणि ढिसाळ धोरणामुळे पालघरची जनता आता पुरती हवालदिल झाली आहे. खालच्या पातळीवरील अधिकारी ऐकत नसल्याने, आता “पालघरचे जिल्हाधिकारी आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालणार का?” असा संतप्त सवाल जनता विचारत आहे.
पालघरमधील जनतेची मुख्य मागणी:

शहरातील सर्व कचरा साठे तात्काळ हटवण्यात यावेत

कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि नागरिकांच्या तक्रारींकडे पाठ फिरवणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात यावी

कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा सुलाईन करून पालघरला दुर्गंधीमुक्त करण्यात यावे

सफाई कामगारांना तात्काळ सुरक्षा साधने पुरवली जावीत
जर प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात लोकप्रतिनिधी, समाजसेवक आणि नागरिक मिळून नगरपरिषदेवर तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. आता चेंडू जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कोर्टात असून, ते या ‘कचरा’ कारभाराची साफसफाई कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button