
विशेष प्रतिनिधी
सफाळे, दि. ७ जून २०२६ :
शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सफाळे येथे एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दिवंगत रविंद्र रोहिदास राऊत यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बीज दत्ता वेल्फेअर असोसिएशन आणि डॉ. बाबासाहेब स्पोर्ट्स क्लब, सफाळे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याचबरोबर विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
हा सामाजिक उपक्रम बीज दत्ता वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आणि अॅड. निखिल रविंद्र राऊत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले तसेच समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत शैक्षणिक मदत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या संध्या राऊत, सुमित गायकवाड, डॉ. बाबासाहेब स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष कृपेश म्हस्के, सचिन जाधव, प्रीतम मोहिते, प्रशांत मोहिते, देवेंद्र मोहिते, अतुल मोहिते, दीपक गायकवाड, सिद्धेश गायकवाड, मंगेश कुरले, वैभव राऊत, कीर्ती शेलार, कल्पेश भोईर, आनंद जाधव, दर्शन मोहिते तसेच परिसरातील शिक्षकवृंद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी VBHC चे प्रितम पाटील, सायलेंट रिसॉर्टचे लोबो , उद्योजक एबीव्ही गोविंदो आणि रिगल बुकचे सुमित यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल आयोजकांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी, “गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देणे हीच दिवंगत रविंद्र रोहिदास राऊत यांना खरी आदरांजली आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते,” असे मत व्यक्त केले.
बीज दत्ता वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्य सुरू असून, या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ मिळाले आहे. मोफत साहित्य वितरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या उपक्रमाचे सफाळे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.