कासा टोलनाक्यावर ५५७ वाहनचालक व नागरिकांची मोफत नेत्र तपासणी; पालघर वाहतूक पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

पालघर | विशेष प्रतिनिधी | ६ जून २०२६
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हा पोलीस दलाने कासा टोलनाका येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा तब्बल ५५७ वाहनचालक व नागरिकांनी लाभ घेतला.
पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेने हा उपक्रम राबविला. महामार्गावरील वाहनचालकांच्या दृष्टीदोषांमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी या शिबिरामध्ये विशेष भर देण्यात आला होता.
शिबिरासाठी पालघर येथील इन्फिगो आय केअर सेंटर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभले. डॉ. भक्ती गाढे, डॉ. सुश्मीता पाटील आणि डॉ. कल्पेश भोईर यांच्या पथकाने उपस्थित वाहनचालक व नागरिकांची सखोल नेत्र तपासणी केली. तपासणीदरम्यान ज्यांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे आढळून आले, अशा लाभार्थ्यांना योग्य नंबरचे चष्मे मोफत देण्यात आले.
यावेळी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. महामार्गावरून धावणाऱ्या ज्या वाहनांवर रिफ्लेक्टर नव्हते, अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांनी मोफत रिफ्लेक्टर बसवून रात्रीच्या वेळी तसेच धुक्यात वाहनांची दृश्यमानता वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.
संपूर्ण शिबिराचे नियोजन जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले. या उपक्रमाबद्दल वाहनचालक, स्थानिक नागरिक तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध घटकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सर्व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करताना सांगितले की, “सुरक्षित दृष्टी आणि सुरक्षित वाहनचालक हे अपघातमुक्त प्रवासाचे महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.”
“सुरक्षित दृष्टी – सुरक्षित प्रवास” हा संदेश देणारे हे शिबिर पालघर जिल्हा पोलिसांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची आणि जनहिताची जाणीव अधोरेखित करणारे ठरले आहे. वाहनचालकांच्या आरोग्याची काळजी घेत रस्ते सुरक्षेला प्राधान्य देणारा हा उपक्रम भविष्यातही अशाच प्रकारे राबविण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button