शिवसेनेने प्रीतम राऊत यांच्यावर टाकला विश्वास; विधानसभा संघटकपदाची धुरा सोपवलीपर्यावरणप्रेमी युवा नेतृत्वाला नवी जबाबदारी;

पालघर, प्रतिनिधी :
पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवून आपली वेगळी राजकीय व सामाजिक ओळख निर्माण करणारे तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेले युवा नेतृत्व प्रीतम राऊत यांची शिवसेना पालघर विधानसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पालघर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना संघटनेला नवचैतन्य मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रीतम राऊत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या राऊत यांनी अल्पावधीतच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करण्याची भूमिका घेतल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि जनसंपर्क यामध्ये प्रीतम राऊत यांचा असलेला अनुभव संघटन विस्तारासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तळागाळातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी ते कटिबद्ध राहतील, असेही यावेळी सांगण्यात आले.
या नियुक्तीप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख केदार काळे, पालघर नगर परिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरत, पालघर तालुकाप्रमुख संजय चौधरी, पालघर शहरप्रमुख राहुल घरत, युवासेना जिल्हाध्यक्ष साईराज पाटील, युवासेना लोकसभा संघटक चेतन धर्ममेहेर, जिल्हा निरीक्षक कुमार माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन प्रीतम राऊत यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी सांगितले की, “प्रीतम राऊत यांच्यासारख्या अभ्यासू, जनसंपर्क असलेल्या आणि पर्यावरणाची जाण असलेल्या नेतृत्वाच्या नियुक्तीमुळे पालघर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल. जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून ते पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवतील, असा विश्वास आहे.”
दरम्यान, प्रीतम राऊत यांच्या नियुक्तीबद्दल राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button