
पालघर, दि. २६ सप्टेंबर २०२५
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पालघर जिल्हा कार्यकारणी, महिला आघाडी, युवा आघाडी, तालुका अध्यक्ष व शाखाप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. ना. रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने लायन्स क्लब हॉल, पालघर येथे जिल्हाध्यक्ष मा. सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. त्यानंतर पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बैठकीत अध्यक्षांनी सांगितले की मराठवाड्यातील महापूर व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, पक्षाचा वर्धापन दिन दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी ऐवजी दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. यावेळी राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹५०,००० तातडीने मदत द्यावी, अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली.
महायुतीच्या यशात रिपाईचा मोठा वाटा असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपाईचे उमेदवार तसेच महायुतीच्या उमेदवारांना पूर्ण मदत केली जाईल, असे ठरविण्यात आले. महिला आघाडीच्या वतीने वर्धापन दिनाला जाण्यासाठी महिलांसाठी बसेसची सोय करून देण्याची मागणी तृप्ती मोरे, रोहिणी गायकवाड व वर्षा काटेला यांनी केली.
या बैठकीत सुवर्णा सचिन चौगुले व निलम राज टेंभेकर यांनी पक्षात प्रवेश करून महिला आघाडीत सक्रिय काम करण्याची इच्छा व्यक्त केली. अध्यक्षांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे काम करणे, गावागावात शाखा निर्माण करणे व पक्षविरोधी काम अजिबात सहन केले जाणार नाही, यावर भर दिला. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत गटनिहाय माहिती देण्यात आली.
बैठकीस जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, उपाध्यक्ष नवीन त्रिपाठी, कुंदन मोरे, संघटक सचिन भारस्कर, पुष्पराज फुलारा, जब्बार सोलंकी, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा रोहिणी गायकवाड, अनु. जमाती अध्यक्षा वर्षा काटेला, उपाध्यक्षा सुप्रिया जाधव, तालुका अध्यक्ष तृप्ती मोरे, नरेंद्र करनकाळे, युवा अध्यक्ष शरद जाधव, तसेच विक्रमगड, पालघर आदी तालुक्यांतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
