
मुंबई | प्रतिनिधी : प्रीती गडा
खार (पूर्व) येथील स्टेशन रोड पासून जवाहर नगर रोड, साईबाबा रोड नाका ते गोलीबार रोडपर्यंत फेरीवाल्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास निर्माण झाला आहे. या रस्त्यावर फेरीवाल्यांनी दोन्ही बाजूंना आपले दुकान मांडल्याने संध्याकाळच्या वेळी वाहन वाहतूक ठप्प होते. पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हण्यानुसार, रोज संध्याकाळी या परिसरात इतका ट्रॅफिक जाम होतो की स्टेशनकडे जाणाऱ्या किंवा येणाऱ्या वाहनांना तासन्तास रांगेत थांबावे लागते. यामुळे रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वाहनांनाही अडथळा निर्माण होतो.
दरम्यान, निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या बीट चौकीतील अधिकारी, तसेच इंदिरा नगर आणि आंबेवाडी बीट चौकीचे अधिकारी व बाईक मार्शल याकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. नियमित गस्त किंवा कारवाई न झाल्याने फेरीवाल्यांचा सुळसुळाट वाढत चालल्याचे नागरिक सांगतात.
स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन, फेरीवाल्यांवर योग्य कारवाई करण्याची आणि वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करण्याची मागणी केली आहे.