पालघर पोलिसांची मोठी कामगिरी! जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाऊंट तयार करून फसवणूक करणारी टोळी जेरबंद; झारखंडमधून दोन आरोपींना अटक, १०० टक्के रक्कम हस्तगत

पालघर, दि. १२ जून २०२६ (प्रतिनिधी) :
पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाऊंट तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पालघर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला असून, झारखंड राज्यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात फसवणूक झालेली संपूर्ण ५० हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर पश्चिम येथील वागुळसार परिसरात राहणारे विनीतकुमार मुंशीलाल मीणा (वय २८) यांच्या व्हॉट्सॲपवर एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला. संबंधित क्रमांकाच्या प्रोफाईलवर पालघरच्या जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड यांचा फोटो वापरण्यात आला होता. स्वतःची ओळख जिल्हाधिकारी म्हणून करून देत आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि तातडीची गरज असल्याचे सांगून एका बँक खात्यावर ५० हजार रुपये पाठविण्याची विनंती केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर विश्वास ठेवून फिर्यादीने संबंधित खात्यावर ५० हजार रुपये वर्ग केले. मात्र, काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पालघर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी १८ मे २०२६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.
सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांची तपासणी आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी झारखंड राज्यातील धनबाद परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांचे विशेष पथक तेथे रवाना करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी बलवंतकुमार कमलाप्रसाद मंडल (वय २६, रा. मनोरमनगर, धनबाद) आणि राजुकुमार दुखन रवानी (वय २२, रा. बँक कॉलनी, गोविंदपूर, धनबाद) या दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून फसवणुकीत गेलेली संपूर्ण ५० हजार रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक (अतिरिक्त कार्यभार सायबर पोलीस स्टेशन) प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, रोहित खोत, विशाल शिर्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश वाघ तसेच पोलीस कर्मचारी संजय धांगडा, कपील नेमाडे, रामदास दुर्गेष्ट, रुपेश पाटील, अक्षय शेट्ये, ऋषिका बारी आणि स्नेहल शेलार यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील करीत आहेत.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियाद्वारे अथवा व्हॉट्सॲपवर पैसे मागितल्यास त्याची खातरजमा केल्याशिवाय पैसे पाठवू नयेत. संशयास्पद संदेश अथवा कॉल आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालघर पोलिसांनी केले आहे.
सायबर गुन्हेगारांविरोधातील पालघर पोलिसांची ही धडाकेबाज कारवाई नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ठरत असून, सायबर गुन्हेगारांना कठोर इशारा देणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button