समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या आंदोलकांना बाहेर येण्याचे आवाहन; आमदार विनोद निकोले यांचीही आंदोलनस्थळी उपस्थिती

पालघर | प्रतिनिधी
वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पालघर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. समुद्राच्या पाण्यात उतरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची भेट घेत त्यांनी सध्याच्या परिस्थितीत आंदोलनाची ही कृती थांबवून सर्वांनी सुरक्षितपणे समुद्राच्या पाण्यातून बाहेर यावे, अशी विनंती केली.
यावेळी आंदोलकांशी संवाद साधताना कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी वाढवणचा लढा संविधानिक आणि लोकशाही मार्गाने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. आपल्या मातीचे, गावाचे आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी हा संघर्ष सुरूच राहणार असून, लोकशाही मार्गाने हा लढा नक्की जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आमदार विनोद निकोले हेदेखील आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाल्याचे चित्र दिसून आले. कॅप्टन ठाकूर यांच्या आवाहनानंतर सध्या समुद्राच्या पाण्यात उतरलेले आंदोलक सुरक्षितपणे बाहेर आले आहेत. मात्र, वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातील आंदोलन अद्याप सुरूच असून, प्रकल्पाला विरोध कायम असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.
समुद्राच्या पाण्यातील आंदोलनाची कृती थांबली असली, तरी वाढवण बंदरविरोधातील संघर्ष थांबलेला नाही. आपल्या हक्कांसाठी, आपल्या गावासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हा लढा संविधानिक व लोकशाही मार्गाने पुढे सुरूच राहील, असा ठाम संदेश कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी दिला.
