न्यायालय परिसर तातडीने केला रिकामा; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन

पालघर | प्रतिनिधी
पालघर सत्र न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सोमवारी (२ नोव्हेंबर) न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी स्फोट घडविण्यात येईल, असा उल्लेख या धमकीच्या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा तातडीने सतर्क झाली. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला.
या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आवश्यक खबरदारी घेतली. तपासणीदरम्यान बॉम्बस्फोटाच्या धमकीबाबत कोणताही प्रत्यक्ष धोका आढळून आला नसून, हा संदेश अफवा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. मात्र, अशा प्रकारच्या धमकीकडे दुर्लक्ष न करता पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उचललेली पावले महत्त्वपूर्ण ठरली.
दरम्यान, पालघर पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरवू नये तसेच सोशल मीडियावर कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. परिसरात कोणतीही अनोळखी किंवा संशयास्पद वस्तू, व्यक्ती अथवा हालचाल निदर्शनास आल्यास स्वतःहून हाताळण्याचा प्रयत्न न करता तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा पोलिसांना माहिती द्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अफवांपेक्षा सतर्कता महत्त्वाची!
सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा ही केवळ पोलिसांचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्याही धमकीच्या संदेशामुळे घाबरून न जाता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणे, अफवा न पसरवणे आणि संशयास्पद बाबींची त्वरित माहिती पोलिसांना देणे, हाच सुरक्षिततेचा योग्य मार्ग असल्याचा संदेश या घटनेतून समोर आला आहे.
