जॉली सी.सी. चिंचणी संघाला उपविजेतेपद; निलेश चौधरी ठरला सामनावीर

पालघर | प्रतिनिधी
ज्येष्ठ क्रिकेटपटूंमधील क्रीडाप्रेम, उत्साह आणि खिलाडूवृत्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘५० प्लस लिजेंड क्रिकेट लीग टूर्नामेंट २०२६’ या स्पर्धेला 24 वर्ष झाले व ही स्पर्धा कुबेर ११ संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात जॉली सी.सी. चिंचणी संघाविरुद्ध रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये कुबेर ११ संघाने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
एमपी स्पोर्ट्सचे आयोजक महेबूब पठाण यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कुबेर ११ संघाने २० षटकांत १४० धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना जॉली सी.सी. चिंचणी संघानेही जोरदार लढत दिली. निर्धारित षटकांमध्ये दोन्ही संघांच्या धावा समान झाल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. मात्र, निर्णायक क्षणी कुबेर ११ संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळवला.
या स्पर्धेत वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार राकेश याला मिळाला. त्याने एकूण १२१ धावा केल्या. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कुबेर ११च्या निलेश म्हात्रे याने ६ बळी घेत बाजी मारली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान कुबेर ११च्या नितीन किनी याला मिळाला. तर सामनावीराचा पुरस्कार जॉली सी.सी.च्या निलेश चौधरी याने पटकावला. त्याने ५ बळी घेण्यासोबतच १३८ धावांची महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
स्पर्धेचे विजेतेपद कुबेर ११ संघाने, तर उपविजेतेपद जॉली सी.सी. चिंचणी संघाने मिळवले. कुबेर ११ संघाने कुबेर पागधरे यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट सांघिक कामगिरी साकारली.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी शिवशक्ती सामाजिक संघटनेचे संजय पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते तथा अॅडव्होकेट विकी शुक्ला यांनी विशेष सहकार्य केले. तसेच अॅड. प्रीतम राऊत, दीपक नायर आणि मजाज शेख यांचेही सहकार्य लाभले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महेबूब पठाण, बॉबी शुक्ला, जे. पी. नौटियाल, दानिश पठाण आणि शुभ शुक्ला यांनी आयोजन समितीच्या माध्यमातून परिश्रम घेतले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान दीपक सांख्ये (बोईसर) यांनी समालोचनाची जबाबदारी सांभाळत सामन्यांमध्ये रंगत आणली.
ज्येष्ठ खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर उतरून आपले कौशल्य दाखवण्याची संधी देणाऱ्या या स्पर्धेमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वयाची मर्यादा बाजूला ठेवून खेळाप्रती असलेली निष्ठा, संघभावना आणि जिद्द यांचे दर्शन या स्पर्धेतून घडले.



