
दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे रिपब्लिकन पक्ष (आठवले)चा ६८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी आपल्या प्रभावी भाषणात आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्ष हा भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व त्यांच्या खुल्या पत्रातील तत्वांवर आधारित असून, पक्ष आदिवासी, दलित, ओबीसी, मराठा व इतर वंचित समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, रिपाई (आ) हा महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीतील उमेदवारांना रिपाईच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी. तसेच महायुतीतील घटक पक्षांनी प्रत्येक जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकांमध्ये रिपाई कार्यकर्त्यांना योग्य वाटा व प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
याबाबत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. “ज्या ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी रिपाईला जागा दिली नाही, त्या ठिकाणी रिपाईकडून मैत्रीपूर्ण पद्धतीने लढत दिली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला रिपाई महिला आघाडी प्रमुख सीमाताई आठवले, युवा नेते जीत आठवले, केंद्रीय सचिव अविनाश म्हातेकर, संघटक सचिव सुरेश दादा बारशिंग, महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, सचिव गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, कोकण अध्यक्ष प्रकाश मोरे, पालघर अध्यक्ष सुरेश जाधव, भिवंडी अध्यक्ष महेंद्र गायकवाड, नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे, शिद्राम ओव्होल यांसह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.