
पालघर, दि. ७ (प्रतिनिधी) :
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होताच पालघर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी बैठका, रणनीती आखणी आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू केली असून इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्काची तयारीही सुरू केली आहे.
या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण १ लाख १६ हजार ६६० मतदार ४ नगराध्यक्ष आणि ९४ नगरसेवकांचे भविष्य ठरवणार आहेत. जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार या तीन नगरपरिषदांबरोबर वाडा नगरपंचायतीत निवडणूक होणार आहे. विकासाच्या दृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून, स्थानिक राजकारणाचे समीकरण या निवडणुकीनंतर बदलू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
🗳️ नगरनिहाय तपशील:
पालघर नगरपरिषद : १५ प्रभाग, ५६ मतदान केंद्र, ३० नगरसेवक
डहाणू नगरपरिषद : १३ प्रभाग, ४१ मतदान केंद्र, २७ नगरसेवक
जव्हार नगरपरिषद : १० प्रभाग, ११ मतदान केंद्र, २० नगरसेवक
वाडा नगरपंचायत : १७ प्रभाग, १७ मतदान केंद्र, १७ नगरसेवक
🏛️ प्रशासनाची तयारी :
४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी निवडणूक पारदर्शक, भयमुक्त आणि शांततेत पार पडावी यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
निवडणुकीदरम्यान भरारी पथके, वेब कास्टिंग व्यवस्था आणि सीसीटीव्ही देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून, प्रत्येक शहरात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. गैरप्रकार किंवा दबाव दिसल्यास नागरिकांना त्वरित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.