
पालघर, दि. ६ नोव्हेंबर :
पालघर नगरपरिषदेतील शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पक्षातील काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढता नाराजीचा सूर आता उघडपणे व्यक्त होऊ लागला असून, काहीजण दुसऱ्या पक्षात प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेतील निर्णयप्रक्रियेत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सहभाग कमी असल्याची, विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याची आणि गटांतर्गत मतभेद वाढल्याची नाराजी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी तीव्र झाली असून, काही जण लवकरच पक्षांतराचा मार्ग स्वीकारू शकतात अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे वरिष्ठ नेते परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आगामी नगरपरिषद निवडणुका पार्श्वभूमीवर या घडामोडींमुळे शिंदे गटाला राजकीय फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, नाराज कार्यकर्त्यांचा ओढा नेमका कोणत्या पक्षाकडे आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, येत्या काही दिवसांत पालघरच्या राजकीय पटावर नवीन समीकरणे आणि हालचाली पाहायला मिळू शकतात.
पालघर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींनी स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे.