पालघर पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी — अज्ञात मयताची ओळख पटवत खून प्रकरणाचा उलगडा; पाच आरोपी अटकेत

पालघर :
मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत वैतरणा धरणाजवळ सापडलेल्या अज्ञात मृतदेहाच्या प्रकरणाचा वेगवान आणि अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून पालघर पोलिसांनी खूनाचा गुन्हा उलगडत पाच आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकांनी मयताची ओळख पटवण्यापासून ते आरोपींच्या अटकेपर्यंत संपूर्ण तपास अत्यंत दक्षता आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पूर्ण केला.

प्रकरणाची सुरुवात – अज्ञात मृतदेहाची नोंद

दिनांक १२ जुलै २०२५ रोजी कसारा पोलीस ठाणे, जि. नाशिक यांचेद्वारे मोखाडा पोलीसांना माहिती मिळाली की वैतरणा धरणाच्या पुलाजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पडलेला आहे. खोडाळा दुर्ग-क्षेत्रातील अंमलदारांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता मृतदेहाच्या दोन्ही पायांना जंगली वेल बांधलेली आढळून आली. या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अ.मू. क्र. २३/२०२५) करण्यात आली.

मयताची ओळख पटली

सदर मृतदेहाची तपशीलवार चौकशी आणि शोधमोहीम राबवून पोलिसांनी शरद कोंडाजी बोडके (वय ३१, रा. मोहाळे, ता. इगतपुरी, जि. नाशिक) अशी मयताची ओळख पटवली. मृतदेहाच्या स्थितीवरून आणि पाय बांधलेल्या अवस्थेवरून ही घटना संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले.

नातेवाईकांच्या चौकशीवरून दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी लक्ष्मी मोहन येलमामे यांच्या फिर्यादीवरून मोखाडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा (गु.र.क्र. १५७/२०२५) भा.दं.वि. कलम १०३(१), २३८(अ), ३(५) प्रमाणे दाखल करण्यात आला.

तपासाचा धागा – जमीन वादातून सूड

स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचा धागा पकडत मयताच्या मूळ गावी मोहाळे येथे बारकाईने तपास केला. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण तसेच चौकशीच्या आधारे पोलिसांनी पाच आरोपींचा सहभाग निष्पन्न केला.

खुनी कटाची उकल

तपासात उघड झाले की –
मयत शरद बोडके हा आरोपी संतोष उर्फ अरुण लक्ष्मण धात्रक याच्यासोबत जमिनीच्या वादावरून सतत भांडत होता तसेच पूर्वी झालेल्या भांडणात त्याने आरोपीच्या कुटुंबीयांवर हल्ला केला होता. या सर्वाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून शरद याचा खून करण्याचा कट रचला.

आरोपींनी दारू पाजण्याचे निमित्त करून मयताला आपल्याबरोबर स्वीप्ट डिझायर (MH-15-JW-0807) कारमध्ये बसवले आणि जांभूळपाडा (त्र्यंबकेश्वर) येथील निर्मनुष्य ठिकाणी नेले. तेथे त्याला दारू पाजून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि गळा आवळून ठार मारले. त्यानंतर मृतदेह जंगली वेलीने बांधून त्याच वाहनातून मोखाडा हद्दीत वैतरणा धरणाजवळ आणून पाण्यात टाकण्यात आला.

अटक झालेले आरोपी

  1. संतोष ऊर्फ अरुण लक्ष्मण धात्रक (वय ३६)
  2. शिवराम लक्ष्मण वाघ (वय २९)
  3. गोकुळ पांडुरंग बेंडकोळी (वय २९)
  4. गणेश बाळू बेंडकोळी (वय २२)
  5. संजय संपत पोटकुळे (वय ३०)

तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही संपूर्ण कारवाई करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सदर तपास श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीर मेहेर यांच्या सूचनांवरून ही तपास मोहीम राबविण्यात आली.

कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील (स्थानीक गुन्हे शाखा) तसेच सपोनि योगेश शिंदे, पोउपनि वानखेडे, खोत, गोरखनाथ राठोड, नलावडे आणि पोलीस कर्मचारी सुर्यवंशी, राऊत, पाटील, ठाकूर, धांगडा, कल्याण केंगार, प्रशांत निकम, महेश अवतार तसेच सायबर सेलचे पोअं/रूपेश पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

सध्या पुढील तपास सुरू

सद्यस्थितीत पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास मोखाडा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रेमनाथ ढोले करत आहेत.

ही कारवाई पालघर पोलिसांच्या तपास कौशल्याचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणून समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button