पालघर जिल्ह्यातील गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा उलगडादोन आरोपी अटकेत; 25 सिलेंडर व मोटारसायकल जप्त

पालघर :
सफाळा आणि केळवा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गॅस सिलेंडर चोरी प्रकरणांमधील चार वेगवेगळ्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात पालघर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात दोन चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २५ गॅस सिलेंडर आणि मोटारसायकलसह एकूण ₹1,28,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सफाळा व केळवा पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्यांनी अंगणवाडी, बंगले आणि शाळांचे दरवाजे तोडून गॅस सिलेंडर चोरी केल्याचे प्रकार घडत होते. याप्रकरणी सफाळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 161/2025, 162/2025, 163/2025 तर केळवा सागरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 73/2025 या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(1), 331(4) अन्वये दाखल करण्यात आले होते.

घटनांची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गठीत करण्यात आले. पथकाने घटनास्थळांची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने दोन संशयितांना ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान त्यांनी सर्व चार गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

दोघांकडून २५ गॅस सिलेंडर आणि चोरीत वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹1.28 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर तपास सफाळा पोलीस ठाण्यांकडून सुरू असून कारवाईमध्ये श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती प्रभा राऊळ, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता शेळके (प्रभारी अधिकारी) व सफाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

ही कारवाई सफाळा पोलिसांच्या दक्षतेचे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या सक्रिय भूमिकेचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button