

पालघर :
पालघर नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत पाटीलवाडी बस स्टॉप ते रोशन पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले तरीसुद्धा कामाच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असतानाही संबंधित ठेकेदाराने घाईघाईत व निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
न.प. निधीतून सुमारे ₹46 लाखांहून अधिक खर्चाचे हे काम असून, प्रत्यक्षात मात्र रस्त्याचे काम पाहता ‘थुक लावून काम’ केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. योग्य साफसफाई, बेस मजबूत न करता थेट डांबरीकरण करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे रस्ता काही दिवसांतच उखडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कामाचा कालावधी तीन महिने (पावसाळा वगळून) असा नमूद असतानाही, दर्जेदार साहित्य व तांत्रिक नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे कामाला ३ वर्षांची देखभाल जबाबदारी असतानाही, अशी हलगर्जी कामगिरी कशी चालते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक तपासणी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.