
पालघर, दि. १७ फेब्रुवारी : मौजे वाढवण, ता. डहाणू येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री (दूरदृष्य प्रणालीद्वारे), उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, श्याम मदनुकर, भूमी अभिलेख अधीक्षक नरेंद्र पाटील, पालघर तहसीलदार रमेश शेंडगे, डहाणू तहसीलदार सुनिल कोळी तसेच मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
युद्धपातळीवर जमीन संपादन
प्रकल्पासाठी आवश्यक रस्ता व रेल्वे उभारणीसाठी जमीन संपादनाची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी दिली. National Highways Authority of India (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) यांच्याकडे सर्व निवाडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून त्यास मान्यता मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
National Highways Act 1956 च्या कलम 3(A) अन्वये 29 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातील एकूण 24 गावांचा यात समावेश असून, त्यापैकी डहाणू तालुक्यातील 10 व पालघर तालुक्यातील 14 गावांतील जमिनींचे संपादन निश्चित करण्यात आले आहे.
निश्चित दर जाहीर
पालघर तालुक्यातील बहुतांश गावांसाठी शेतजमिनीचा दर प्रति हेक्टर 62 लाख 50 हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. बिनशेती जमिनींसाठी गावनिहाय प्रति चौ.मी. 780 ते 2940 रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत.
डहाणू तालुक्यातील वरोर, चिंचणी, तणाशी या गावांसाठी शेतजमिनीचा दर 1 कोटी 16 लाख 44 हजार 106 रुपये प्रति हेक्टर तर बावडे, कोलवली, वाणगाव या गावांसाठी 1 कोटी 22 लाख 42 हजार 408 रुपये प्रति हेक्टर निश्चित करण्यात आला आहे. काही गावांसाठी 62 लाख 50 हजार रुपये प्रति हेक्टर दर लागू राहणार आहे.
प्रकल्पग्रस्तांना दुप्पट मोबदला
प्रकल्पग्रस्तांना निश्चित बाजारमूल्याच्या दुप्पट (2 पट) मोबदला देण्यात येणार असून त्यावर 100 टक्के दिलासा रक्कम तसेच 29 ऑगस्ट 2024 पासून मूळ दरावर 12 टक्के अतिरिक्त घटक (व्याज) देण्यात येणार आहे.
जमिनीवरील बांधकाम, झाडे, विहीर, बोअरवेल आदी मालमत्तांचे स्वतंत्र मूल्यांकन करून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याने बाधित खातेदारांना कायदेशीर तरतुदीनुसार अधिकतम आर्थिक संरक्षण मिळणार आहे.
कागदपत्रे सादर करणे बंधनकारक
संपादित क्षेत्राचा मोबदला स्वीकारण्यासाठी 60 दिवसांच्या आत अद्ययावत 7/12 उतारा, फेरफार नोंदी, ओळखपत्र, बँक पासबुक (IFSC सहित), वारस हक्काचा पुरावा (लागू असल्यास) आदी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
पालघर तालुक्यासाठी सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे तर डहाणू तालुक्यासाठी सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सुर्या प्रकल्प, डहाणू येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी संबंधित तलाठी कार्यालयांना सुविधा केंद्राच्या स्वरूपात कामकाज करण्याच्या सूचना दिल्या असून महसूल अभिलेख अद्ययावत करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देशही दिले.
“भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता, वेग आणि न्याय सुनिश्चित करणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. बाधित नागरिकांनी वेळेत कागदपत्रांची पूर्तता करून मोबदला स्वीकारावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी केले