
मुंबई प्रतिनिधी प्रीती गडा
मुंबई : Brihanmumbai Municipal Corporation (BMC) च्या H/E वॉर्डच्या अतिक्रमण विभागाने सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी Khar (East) येथील स्टेशन रोड परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. या कारवाईत ४ ते ५ फेरीवाल्यांचे सामान जप्त करून ते महानगरपालिकेकडे जमा करण्यात आले.
मात्र स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या मते ही कारवाई अर्धवट स्वरूपाची राहिली आहे. स्टेशन रोडपासून सुमारे १५० मीटर अंतरावर अनेक हातगाडी फेरीवाले नियमितपणे उभे राहत असून त्यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. खार (पूर्व) येथील रस्ता तुलनेने अरुंद असल्याने रस्त्याच्या मधोमध हातगाड्या फिरत राहतात, त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याची तक्रार आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही दुकानदार दुकानासमोर हातगाडी लावण्यासाठी पैसे घेत असल्याचीही चर्चा आहे. यामुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी BMC H/E वॉर्डच्या वॉर्ड अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, स्टेशन रोड परिसरातील सर्व अनधिकृत हातगाडी व फेरीवाल्यांवर समान आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होऊन परिसरातील शिस्त आणि सुरक्षाही अबाधित राहील.