
बोईसर | प्रतिनिधी
वॉकीटॉकीचा वापर करून महिलेची दिशाभूल करत तिच्याकडून एटीएम कार्ड व पासवर्ड मिळवून खात्यातून पैसे काढणाऱ्या आरोपीला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी महिला एटीएममधून पैसे काढण्यासाठी बोईसर-शिवाजीनगर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गेली होती. एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर ते अडकले. त्यावेळी वॉकीटॉकीवरून बोलणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःला एटीएम ऑपरेटर असल्याचे भासवून महिलेला एटीएममधील सूचना सांगितल्या.
आरोपीने महिलेला एटीएम मशीनमधील बटणे दाबण्यास सांगितले. त्यानंतर कार्ड बाहेर निघाले नाही. पुढे आरोपीने मोबाईल क्रमांक लिहून ठेवण्यास सांगत, मशीन ऑपरेटर आल्यानंतर कार्ड काढून फोन करून परत देण्याचे आमिष दाखवले. महिलेने घरी परतल्यानंतर आरोपीने तिच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले. तसेच एटीएमचा पासवर्ड मिळवून तिच्या खात्यातून १० हजार रुपये काढल्याचे पोलिस तपासात समोर आले.
या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत जितेंद्र रामदेव पाल, वय २६ वर्षे, व्यवसाय चालक, रा. जयभीमनगर, मनिषनगर, गेट नं. २, कलवा पश्चिम, ठाणे, मूळ गाव उत्तर प्रदेश, याला अटक केली.
तपासादरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन वॉकीटॉकी संच आणि वाहन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सांकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नराळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुनील सांकळे, पोलीस उपनिरीक्षक विनय मोरे यांच्यासह बोईसर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
नागरिकांनी एटीएम वापरताना सावध राहण्याचे आवाहन
या घटनेमुळे एटीएम केंद्रांमध्ये अनोळखी व्यक्तींकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांवर विश्वास ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. एटीएम कार्ड, पासवर्ड, ओटीपी किंवा बँक खात्याची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये, तसेच एटीएममध्ये कार्ड अडकल्यास संबंधित बँकेच्या अधिकृत हेल्पलाइनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.