
पालघर | प्रतिनिधी
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पालघर शहरासह जिल्ह्यात गणेशमूर्ती विसर्जनाचा सोहळा भक्ती, उत्साह आणि शिस्तीच्या वातावरणात निर्विघ्नपणे पार पडला. गणेशभक्तांची मोठी गर्दी, विसर्जन मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर आणि वाढती वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पालघर पोलिसांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे विसर्जन सोहळा सुरळीत पार पडला.
गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच पोलिसांनी गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधत बंदोबस्ताचे नियोजन केले होते. ‘एक गणपती, एक अंमलदार’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक मंडळाशी थेट संपर्क ठेवण्यात आला. मिरवणुकीची वेळ, निर्धारित मार्ग, ध्वनीविषयक नियम, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन तसेच विसर्जनावेळी घ्यावयाची खबरदारी याबाबत मंडळांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
विसर्जन मार्गावर पोलिसांचा कडेकोट पहारा
गणेश मंडळांच्या मिरवणुका निश्चित वेळेत आणि निर्धारित मार्गानेच पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. प्रमुख चौक, संवेदनशील ठिकाणे, गर्दीचे परिसर आणि विसर्जनस्थळांवर अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन
विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेने स्वतंत्र आराखडा तयार केला होता. गणेशभक्तांची गर्दी, मिरवणुकीचे मार्ग आणि वाहनांची वर्दळ यांचा समन्वय साधत आवश्यक ठिकाणी वाहतूक नियमन करण्यात आले. प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची विशेष तैनाती करण्यात आली.
अँटी-ड्रोन पथकाकडून आकाशातूनही नजर
यंदाच्या गणेश विसर्जन बंदोबस्ताचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अँटी-ड्रोन पथकाची तैनाती. गर्दीची ठिकाणे, मिरवणूक मार्ग आणि संवेदनशील परिसरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आकाशातूनही देखरेख ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कोणतीही संशयास्पद ड्रोन हालचाल आढळू नये तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तत्काळ करता याव्यात, यासाठी अँटी-ड्रोन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.
‘उत्सव प्रहरी’ ॲपद्वारे डिजिटल देखरेख
बंदोबस्तात तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर करण्यात आला. विसर्जन मिरवणुकीचे मार्ग तसेच प्रमुख विसर्जनस्थळांचे फोटो आणि व्हिडिओ ‘उत्सव प्रहरी’ ॲपवर अपलोड करून परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. वरिष्ठ पातळीवरून उत्सव व्यवस्थापन आणि बंदोबस्ताच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले.
लहान मुलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य
विसर्जनस्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी लहान मुले, मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी थेट पाण्यात उतरू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नियुक्त स्वयंसेवक आणि जीवरक्षकांच्या मदतीने विसर्जन प्रक्रिया सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यात आली.
एसपी यतीश देशमुख यांची प्रत्यक्ष पाहणी
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करत पोलीस यंत्रणेला आवश्यक मार्गदर्शन केले. अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्यासह संबंधित अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी विविध ठिकाणी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळत होते.
विसर्जनाचा सोहळा पूर्ण होईपर्यंत अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर तैनात राहिले. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने कार्यरत होती.
गणेश मंडळे आणि नागरिकांचे पोलिसांना सहकार्य
गणेशोत्सव हा भक्ती आणि उत्साहाचा सण असला तरी नियमांचे पालन आणि नागरिकांची सुरक्षितता ही सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. या आवाहनाला गणेश मंडळे आणि नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत पोलिसांच्या सूचनांचे पालन केले.
नियोजन, समन्वय, तंत्रज्ञान, शिस्त आणि सतर्कता यांचा प्रभावी मेळ साधत पालघर पोलिसांनी अनंत चतुर्दशीचा बंदोबस्त पार पाडला. ‘एक गणपती, एक अंमलदार’ या संकल्पनेपासून अँटी-ड्रोन पथक आणि ‘उत्सव प्रहरी’ ॲपपर्यंत विविध स्तरांवर करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे गणेशभक्तांचा उत्साह कायम ठेवत विसर्जन सोहळा शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पडला.