
पालघर | प्रतिनिधी
पालघर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधील गांधीनगर परिसरातील अनियमित पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर प्रश्नावर नगरसेवक आरिफ कलाडिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या या मूलभूत समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी त्यांनी सोमवारी पालघर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरत आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
गांधीनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर परिसरातील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत नगरसेवक आरिफ कलाडिया यांनी नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर ठामपणे मांडल्या. पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करणे, प्रलंबित कचरा तातडीने हटविणे तसेच नियमित स्वच्छता व्यवस्था प्रभावीपणे राबविणे, या मागण्यांकडे त्यांनी नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले.
दरम्यान, गांधीनगरमधील पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न एका आठवड्याच्या आत मार्गी लावावा, अशी स्पष्ट मागणी नगरसेवक कलाडिया यांनी केली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
“गांधीनगरमधील पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न एका आठवड्यात सोडवा; अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा आरिफ कलाडिया यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला.
आता नगरसेवकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पालघर नगरपरिषद प्रशासन गांधीनगरमधील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर कोणती ठोस पावले उचलते, तसेच दिलेल्या मुदतीत समस्या प्रत्यक्षात कितपत सुटतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.