मोठी सूट, कमी किमतीच्या आमिषाला बळी पडू नका; बनावट वेबसाइटच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचा धोका

पालघर | विशेष प्रतिनिधी
ऑनलाइन खरेदीचा वाढता ट्रेंड आणि ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या विविध ऑफर्सचा फायदा घेत सायबर भामटे आर्थिक फसवणुकीचे नवनवीन प्रकार करत आहेत. ‘९० टक्के सूट’, ‘फक्त आजची ऑफर’, ‘मर्यादित वेळेत खरेदी’ किंवा बाजारभावापेक्षा अत्यल्प किमतीत महागड्या वस्तू अशा आकर्षक जाहिराती दाखवून ग्राहकांना बनावट संकेतस्थळे आणि संशयास्पद लिंकच्या जाळ्यात ओढले जात असल्याने ऑनलाइन खरेदी करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आकर्षक ऑफरच्या नावाखाली फसवणुकीचा डाव
सायबर भामटे सुरुवातीला मोठी सूट किंवा अतिशय कमी किमतीतील वस्तू दाखवून ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. ग्राहकाने ऑर्डर करून ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर पेमेंट यशस्वी झाल्याचा संदेशही पाठवला जातो. त्यामुळे ग्राहकाला आपली ऑर्डर निश्चित झाली असून लवकरच वस्तू मिळेल, असा विश्वास बसतो.
मात्र, काही दिवस उलटूनही वस्तू मिळत नाही. विक्रेत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास फोन बंद, ई-मेलला प्रतिसाद नाही किंवा वेबसाइटच बंद झालेली आढळते. त्यानंतर संबंधित संकेतस्थळ बनावट असल्याचे लक्षात येते आणि ग्राहकाचे पैसे सायबर फसवणुकीत गेल्याचे स्पष्ट होते.
खरेदीपूर्वी ‘या’ गोष्टी तपासा
ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी संबंधित वेबसाइटची URL काळजीपूर्वक तपासावी. संकेतस्थळ सुरक्षित आहे का, विक्रेता किंवा कंपनीची अधिकृत माहिती उपलब्ध आहे का, याची खात्री करावी. इतर ग्राहकांनी दिलेले Reviews आणि अनुभव वाचल्यानंतरच खरेदीचा निर्णय घ्यावा.
अतिशय मोठी किंवा बाजारभावापेक्षा अवास्तव कमी किंमत दिसत असल्यास विशेष सावध राहावे. सोशल मीडिया, एसएमएस किंवा ई-मेलद्वारे आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करून थेट खरेदी करणे टाळावे.
सुरक्षित पेमेंटला प्राधान्य
ऑनलाइन व्यवहार करताना विश्वासार्ह आणि सुरक्षित पेमेंट पर्यायांचा वापर करावा. शक्य असल्यास विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवरील Cash on Delivery (COD) पर्यायाचा विचार करावा. कोणत्याही संशयास्पद वेबसाइटवर कार्ड, बँक खाते, OTP किंवा इतर संवेदनशील माहिती देऊ नये.
ऑनलाइन व्यवहार केल्यानंतर पेमेंटचे स्क्रीनशॉट, व्यवहार क्रमांक, ऑर्डरची माहिती, ई-मेल, एसएमएस तसेच संबंधित वेबसाइट किंवा लिंक जतन करून ठेवावी. भविष्यात फसवणूक झाल्यास हे पुरावे तक्रार नोंदवताना महत्त्वाचे ठरू शकतात.
फसवणूक झाल्यास वेळ न दवडता १९३० वर संपर्क
सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाबरून न जाता तातडीने कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर त्वरित संपर्क साधावा. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी.
तक्रार करताना व्यवहाराची रक्कम, तारीख, व्यवहार क्रमांक, स्क्रीनशॉट, संशयास्पद लिंक, मेसेज आणि उपलब्ध इतर पुरावे सोबत ठेवावेत.
‘ऑफर कितीही आकर्षक असली तरी आधी तपासा, मगच खरेदी करा’ हा नियम ऑनलाइन खरेदी करताना प्रत्येक ग्राहकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. थोडीशी सावधगिरी आणि पडताळणी केल्यास मोठे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.