
पालघर : विशेष प्रतिनिधी
पालघर : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या केशरयुक्त पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवर पालघर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तलासरी पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचरी महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यावर सापळा रचून केलेल्या कारवाईत ४९ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला जप्त केला. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आयशर टेम्पोसह एकूण ६९ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी उत्तर प्रदेशातील टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी जिल्हा पोलीस दलाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसाय व बेकायदेशीर वाहतुकीविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे सापळा
१९ ऑक्टोबर २०२६ रोजी तलासरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोतून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला, गुटखा व सुगंधी सुपारीची वाहतूक केली जात आहे.
या माहितीच्या आधारे तलासरी पोलीस ठाण्याच्या पथकाने दापचरी येथील महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यावर सापळा रचला. संशयित आयशर टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता, सुरुवातीला त्यामध्ये इलेक्ट्रिक साहित्य आढळून आले. मात्र, या साहित्याच्या मागील बाजूस तपासणी केली असता, महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला ४९ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा केशरयुक्त पानमसाला आढळून आला.
पोलिसांनी प्रतिबंधित पानमसाला आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर टेम्पो असा एकूण ६९ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
चालकाला अटक; तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी टेम्पोचालक याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
आरोपीविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता गुजर करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयंत गडग, पोलीस नाईक नयन डोंगरकर, पोलीस नाईक सचिन आव्हाड आणि पोलीस शिपाई इंद्रभान लंबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पालघर पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.
