महसूल, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य आणि शिक्षणाच्या समस्यांवर नागरिकांनी मांडल्या व्यथा; जिल्हास्तरावरच प्रश्न सोडविण्याचे प्रशासनाला आदेश

पालघर प्रतिनिधी
पालघर, दि. २३ ऑक्टोबर २०२६ : नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे जिल्हास्तरावरच प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या जनता दरबारात विविध समस्यांबाबत तब्बल १,०५८ अर्ज प्राप्त झाले. या अर्जांतील तक्रारींची दखल घेत पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा जनता दरबार पार पडला. जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडीअडचणी थेट पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. महसूल व जमीनविषयक तक्रारी, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभांशी संबंधित प्रश्नांचा यामध्ये समावेश होता.
पालकमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांचे म्हणणे जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्येक प्रकरणानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या तक्रारी केवळ नोंदवून न ठेवता त्यांचे प्रत्यक्ष निराकरण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. काही प्रकरणांमध्ये जागेवरच निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
‘नागरिकांना मंत्रालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ येऊ नये’
सामान्य नागरिकांना आपल्या छोट्या-मोठ्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये. त्यांच्या अडचणी जिल्हास्तरावरच तातडीने आणि प्रभावीपणे सोडविल्या गेल्या पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाला दिले.
नागरिकांच्या समस्या सोडविणे ही संबंधित अधिकाऱ्यांची प्राथमिक जबाबदारी असून, प्रत्येक प्रकरण संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने हाताळले पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले. नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार उंबरठे झिजवावे लागू नयेत, तसेच त्यांच्या कामांमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
विभागांमध्ये समन्वय राखून तक्रारींचा निपटारा करा
जनता दरबारात प्राप्त झालेल्या १,०५८ अर्जांवर जलद आणि प्रभावी कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखावा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. एखादी समस्या अनेक विभागांशी संबंधित असल्यास त्याबाबत समन्वयाने निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करताना केवळ औपचारिकता न पाळता ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या जनता दरबारामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली असून, विविध विभागांतील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या जनता दरबाराला खासदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे आणि उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रणजित देसाई यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, पालघरमधील जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडल्या गेल्या असून, प्राप्त १,०५८ अर्जांवरील कार्यवाहीकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. या उपक्रमातून जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाला गती मिळून सर्वसामान्यांचे प्रश्न वेळेत सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.