महापौर ऋतु तावडेंचे आदेश हवेतच! खार (पूर्व) येथील वॉर्ड क्रमांक ९४ मध्ये नवरात्रोत्सवाचे बॅनर अद्यापही विजेच्या खांबांवर!

BMC H/E विभागाचा अजब कारभार; नियम सांगणारे प्रशासन स्वतःच नियमांच्या अंमलबजावणीत अपयशी?

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईत रस्त्यांवर प्लास्टिकचे बॅनर आणि अनधिकृत जाहिरात फलक लावण्यास मनाई असल्याचे महापौर ऋतु तावडे स्पष्टपणे सांगत असताना, दुसरीकडे खार (पूर्व) येथील वॉर्ड क्रमांक ९४ मध्ये मात्र महापालिकेच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे. नवरात्रोत्सव संपून बराच काळ उलटून गेला तरी रस्त्यावरील विजेच्या खांबांवर नवरात्रोत्सवाचे मोठमोठे बॅनर आणि फलक अद्यापही लटकत असल्याने मुंबई महापालिकेच्या H/E विभागाच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खार (पूर्व) परिसरातील जयेश सुपर मार्केटजवळील रस्त्यावर विजेच्या खांबाला बांधण्यात आलेला नवरात्रोत्सवाचा मोठा बॅनर आजही कायम असल्याचे छायाचित्रातून स्पष्ट दिसत आहे. उत्सव संपल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी लावलेले बॅनर आणि फलक हटवण्याची जबाबदारी संबंधित आयोजकांसह महापालिका प्रशासनाची असतानाही, इतक्या दिवसांपासून या फलकाकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापौरांचे निर्देश एका बाजूला, H/E विभागाचा कारभार दुसऱ्या बाजूला!

महापौर ऋतु तावडे यांनी रस्त्यांवर प्लास्टिक बॅनर लावू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिलेले असताना त्यांच्याच प्रशासनाच्या H/E विभागाच्या हद्दीत अशा प्रकारचे बॅनर खुलेआम झळकत असतील, तर या आदेशांची अंमलबजावणी नेमकी कोण करणार? महापौरांच्या भूमिकेला महापालिकेचे अधिकारी गांभीर्याने घेत आहेत की नाही, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे, रस्त्यावरील विजेच्या खांबांवर अशा प्रकारे बॅनर बांधल्याने सार्वजनिक मालमत्तेचा अनधिकृत वापर होत असून शहराच्या विद्रूपीकरणालाही हातभार लागत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी संबंधित विभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

H/E विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी जबाबदारी स्वीकारणार की हात झटकणार?

खार (पूर्व) वॉर्ड क्रमांक ९४ मधील अनधिकृत बॅनर तातडीने हटवावेत, संबंधित आयोजकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी आणि या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

एकीकडे मुंबईला बॅनरमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे प्रत्यक्ष रस्त्यांवर अनधिकृत फलक झळकत असताना प्रशासनाने मौन बाळगायचे, हा कोणता कारभार?

महापौर ऋतु तावडे यांचे आदेश प्रत्यक्षात उतरवण्याची हिंमत H/E विभाग दाखवणार का? की खार (पूर्व) मधील वॉर्ड क्रमांक ९४ मध्ये नियमभंग असाच सुरू राहणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

↑
error: Content is protected !!
Call Now Button