
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील
पालघर दि 16 : विविध शासकीय योजनेच्या लाभा पासून वंचित असलेल्या घटकांना विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनेचा लाभ मिळणार असल्याचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले
विकसित भारत संकल्प यात्रा वाडा तालुक्यातील कोंढले गावात पोहचली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते.
मागील साडे नऊ वर्षांपासून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फक्त आणि फक्त देशातल्या गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करत आहेत. प्रधानमंत्र्यांनी बघितलेलं २०४७ चं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. ज्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांची ही गाडी आपल्या गावात आली आहे. आणि संपूर्ण देशात फिरत आहे. जन औषधी केंद्राच्या माध्यमातून औषधांच्या किंमती कमी करण्याची किमया ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी केली आहे असं ही यावेळी श्री पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी किसान सन्मान निधी, स्वामित्व योजना, आयुष्यमान भारत योजना, उज्वला योजना यासारख्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी घेतलेल्या लाभाविषयीची माहिती दिली. तसेच केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, महिला बचत गट कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांना लाभाचे आणि प्रमाणपत्रांचे वाटप केले . श्री पाटील यांनी विविध शासकीय योजनेच्या लाभार्थ्याशी संवाद देखील साधला.
कोंढले गावात या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचं गावकऱ्यांकडून मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले . या विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने कोंढले ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ न मिळालेल्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातचं उपलब्ध करून देण्यासाठी उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत – जन आरोग्य योजना, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या योजना या सारख्या शासनाच्या विविध योजनांची शिबिरे लावण्यात आली होती. यावेळी अनेक नागरिकांचे आयुष्यमान कार्ड साठी रजिस्ट्रेशन, आणि उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस जोडणीसाठी महिलांची नोंदणी करून घेण्यात आली . यावेळी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.
यावेळी कोंढले गावात दाखल झालेल्या या विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, , महिला वर्ग, वयोवृध्द आदी उपस्थित होते.
