गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला अखेर अटक; पालघर पोलिसांची कारवाई

पालघर : वाळवे (ता. पालघर) येथे प्रेमविवाहाच्या रागातून घरात घुसून गोळीबार करून पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. सुमारे आठवडाभर फरार असलेल्या आरोपीला तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे जेरबंद करण्यात आले.
दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास वाळवे बसस्टॉपजवळ राहणारे प्रितेश सुरेश वरखंडे (वय २२) यांच्या घरात आरोपी उमेश उर्फ प्रल्हाद मोतीराम घरत (वय ५२, रा. बेटेगाव, ता. पालघर) हा घुसला. फिर्यादीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आरोपीने प्रितेश वरखंडे यांचे वडील सुरेश राजा वरखंडे (वय ५२) यांच्या डोक्याच्या मागील बाजूस पिस्तुलातून गोळी झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
यानंतर आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पत्नीशी झटापट करून मारहाण केली तसेच मिरचीपूड फेकून मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३३१(६), ११५(२), ३५२, ३५१(२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व शस्त्र अधिनियम कलम ३, २५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी फरार आरोपी उमेश घरत याचा शोध घेत १ मार्च २०२६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वर्णी पोलीस ठाणे हद्दीतून त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोउपनिरीक्षक चंद्रकांत हाके तसेच बोईसर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button