शिरगाव येथे सुरू असलेल्या ग्लोबल कोकण सरस महोत्सव २०२६ मध्ये पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळाचा स्टॉल विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. वंजारी समाजाचा समृद्ध इतिहास, २४ गावांचा सामाजिक प्रवास, भटक्या व्यापारी परंपरेपासून आधुनिक नेतृत्वापर्यंतची वाटचाल, चालीरीती-परंपरा, भाषा, आडनावे तसेच शिक्षणाच्या माध्यमातून साधलेली प्रगती यांचे प्रभावी सादरीकरण या स्टॉलमध्ये करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंडळाचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, वसई-विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील, जीएसटी विभागाचे आयएएस अधिकारी नितीन पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, नगरसेवक भावानंद संखे, अमिश पिंपळे आदी मान्यवरांनी स्टॉलला सदिच्छा भेट दिली.
जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी स्टॉलमधील माहितीची आस्थेने पाहणी करून समाधान व्यक्त केले, तर खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी वंजारी समाज हा शिक्षणामुळे झपाट्याने प्रगती करणारा समाज असल्याचे गौरवोद्गार काढले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या वंजारी समाजबांधवांनी स्टॉलला भेट देत समाज बॅज अभिमानाने परिधान केला.