बनावट कॉल सेंटरवर पालघर पोलिसांचा छापा; परदेशीय नागरिकांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

पालघर : पालघर पोलीस ठाणे हद्दीतील माहिम (पालघर पश्चिम) परिसरात बनावट कॉल सेंटर चालवून परदेशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ५ लाख ७२ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
माहिम येथील एका रहिवाशी इमारतीमध्ये अनधिकृत कॉल सेंटर चालवून परदेशातील नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास माहिम येथील फिया एकांत बिल्डिंगमधील रूम क्रमांक ३०३ येथे छापा टाकण्यात आला. छाप्यात फ्लॅटमध्ये कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ४ लॅपटॉप, १२ मोबाईल फोन, ४ हेडफोन, टीपी-लिंक कंपनीचा राऊटर व एअरटेल डोंगल असा एकूण ५,७२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी भरत लालवानी (मिरारोड), रोहित निंबाळकर (पुणे), रोहित झोहे (मिरारोड), अमरदीप गिल (भाईंदर) व सागर पाठडिया (सुरत) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपासात उघडकीस आले की, आरोपी अमेरिकेतील नागरिकांची मोबाईल क्रमांक व वैयक्तिक माहिती बेकायदेशीररित्या मिळवून स्वतःला मायक्रोसॉफ्ट व अॅपल कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगत. नागरिकांच्या संगणक किंवा मोबाईलमध्ये व्हायरस आल्याचे भासवून ते दुरुस्त करण्याच्या नावाखाली Apple, Amazon, Nike आणि Lawes गिफ्ट कार्डच्या स्वरूपात किमान ५०० ते ४००० अमेरिकन डॉलरपर्यंतची रक्कम उकळली जात होती. नंतर ही रक्कम यूएसडीटी क्रिप्टोकरन्सीत रूपांतरित करून हवाला मार्गे रोख स्वरूपात मिळवली जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील व त्यांच्या पथकाने तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पार पाडली. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button