अवैध प्रवासी वाहनांवर १ मार्चपासून मोठी मोहीम

मुंबई प्रतिनिधी प्रीती गडा
मुंबई, दि. २७ फेब्रुवारी : राज्यात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी १ मार्चपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. या मोहिमेद्वारे परवाना नसलेल्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवासी वाहनांवर कडक कारवाई केली जाणार असून मोटार परिवहन विभागाला (RTO) याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा किंवा आवश्यक परवानग्या नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणाऱ्या आणि सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, अवैध प्रवासी वाहतूक ही केवळ नियमभंगाची बाब नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी निगडित गंभीर समस्या आहे. अनेक वाहनांकडे वैध विमा नसल्याने अपघात झाल्यास प्रवाशांना नुकसानभरपाई मिळण्यात अडचणी निर्माण होतात. तसेच वाहनांची योग्य तपासणी न केल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून नियम पाळणाऱ्या अधिकृत वाहतूकदारांना अन्यायकारक स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. परिणामी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या मोहिमेत नियमित तपासणी, संयुक्त पथकांमार्फत कारवाई आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे. परवाना प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि ऑनलाइन सुलभ करण्यात येणार असून प्रवाशांनीही परवानाधारक वाहन सेवांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर नियंत्रण आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून जनतेच्या सहकार्यामुळे सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button