पालघर, दि. ७ ऑगस्ट २०२५ – एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जिल्हा पालघर येथे पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती कोमल किशोर संखे यांनी आपली यशस्वी सेवा पूर्ण केली आहे. ३१ जुलै २०२५ रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या.
श्रीमती संखे यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे. २३ मार्च १९८८ रोजी, त्यांनी तलासरी सारख्या दुर्गम भागात आपली सेवा सुरू केली होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक वेळा डोंगराळ, दुर्गम भागांत जाऊन काम केले. वाहन सुविधेचा अभाव असतानाही त्यांनी पायी प्रवास करून आपली जबाबदारी पार पाडली.
डहाणू तालुक्यातील कोलवली हे त्यांचे माहेर, तर बोईसर येथील कांबळगाव हे त्यांचे सासर. विवाहानंतर अवघ्या सात वर्षांत त्यांचे पती अपघातात निधन पावले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षण पूर्ण करून नोकरीत आपला ठसा उमटवला. आपल्या कर्तव्यनिष्ठेमुळे आणि सेवाभावनेमुळे त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे मन जिंकले.
त्यांच्या निस्वार्थ सेवेसाठी आणि संघर्षशील जीवनासाठी, २०२१ साली त्यांना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महिलांच्या आणि बालकल्याणाच्या योजनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
श्रीमती कोमल संखे यांचा जीवनप्रवास नव्या पिढीसाठी एक दीपस्तंभ आहे. त्यांच्या पुढील जीवनाला पालघर जिल्हा प्रशासन आणि सहकारी वर्गाकडून मनःपूर्वक शुभेच्छा.
