खार (पूर्व) वार्ड क्रमांक 94 : जवाहरनगर रोडवरील लटकणाऱ्या लाईट्स व डेकोरेशन नागरिकांसाठी धोकादायक

मुंबई, खार (पूर्व) वार्ड क्रमांक 94 — जवाहरनगर रोड परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बांधलेले गेट, फलक आणि लटकणाऱ्या लाईट्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जयेश सुपर मार्केट, हिरालाल नेमीचंद ज्वेलर्स, अमरीश भवन आणि शंकर मंदिर परिसरात ही डेकोरेशनची साधने अजूनही रस्त्यावर लटकत आहेत.

नागरिकांच्या तक्रारीनुसार, या लटकणाऱ्या लाईट्स व डेकोरेशनमुळे वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही धोका निर्माण झाला आहे. परिसरात ट्रॅफिकचा ताण वाढत असून, गर्दी नसतानाही वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे.

स्थानिक रहिवाशांनी ऑनलाईन तक्रार करूनही अद्याप संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे. गणेशोत्सवानंतर बऱ्याच दिवसांनंतरही या डेकोरेशन साहित्याची उचल न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रहिवाशांचा प्रश्न आहे की — “गणेशोत्सव संपून कित्येक दिवस झाले, तरी या लटकणाऱ्या लाईट्स आणि गेट कोण काढणार? अपघात झाल्यावरच प्रशासन हलते का?”

स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका (H/E वॉर्ड) आणि नर्मल नगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडे त्वरित लक्ष देऊन हे धोकादायक डेकोरेशन काढून सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button