कु. रिचा पाटील आत्महत्या प्रकरणात सखोल चौकशी होणार – पोलिस आयुक्तांचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन

विरार
विरार पश्चिम येथील विवा कॉलेजमधील एफ.वाय.बी.कॉममध्ये शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनी कु. रिचा सचिन पाटील हिने दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण वसई-विरार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्त यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

या शिष्टमंडळात भाजप वसई-विरार शहर जिल्हा अध्यक्षा सौ. प्रज्ञा पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री. जोगेंद्र प्रसाद चौबे, श्री. बिजेंद्र कुमार, श्री. मनोज बारोट, श्री. भूषण किणी, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. ज्योत्स्ना मेहेर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री. विनीत तिवारी, तसेच श्री. योगेश सिंह आणि श्री. अश्विन सावरकर यांचा सहभाग होता.

शिष्टमंडळाने निवेदन देताना सांगितले की, “ही घटना फक्त एका विद्यार्थिनीची नाही तर असंख्य मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. शिक्षणाच्या मंदिरात विद्यार्थिनींना असुरक्षित वाटणे हे समाजासाठी गंभीर चिंतेचे कारण आहे. म्हणूनच या प्रकरणातील दोषींना कायद्याच्या चौकटीत राहून कठोर शिक्षा व्हावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.”

या वेळी पोलिस आयुक्तांनी आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, “या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. कोणालाही वाचवले जाणार नाही आणि दोषींना कठोर शिक्षा होईल. विद्यार्थिनींचे सुरक्षित शिक्षण हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे.”

आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सांगितले की, “कु. रिचा सारख्या मुलींच्या आत्महत्येमुळे समाज अस्वस्थ झाला आहे. पालकांनी आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन विद्यार्थिनींच्या सुरक्षेला सर्वात महत्त्व द्यावे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

या भेटीमुळे कु. रिचा पाटील आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला नव्याने गती मिळणार असून नागरिकांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button