“आदि कर्मयोगी अभियान” मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

पालघर, दि. 20 ऑक्टोबर –
“आदि कर्मयोगी अभियान” अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा मानाचा सन्मान महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला असून, पालघर जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासकार्याची ही दखल मानली जात आहे.
या यशामागे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गणेश नाईक यांचे दूरदर्शी नेतृत्व, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे प्रभावी मार्गदर्शन, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनोज रानडे यांचे कुशल प्रशासकीय नियोजन महत्त्वाचे ठरले आहे.
यासोबतच, प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर (जव्हार प्रकल्प) व प्रकल्प अधिकारी श्री. विशाल खत्री (डहाणू प्रकल्प) यांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे या अभियानाला यश मिळाले.
जिल्ह्यातील विविध लाइन विभागांचे अधिकारी, कर्मचारी, तसेच दोन्ही प्रकल्प कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे योगदान दिले. विशेष उल्लेखनीय म्हणजे आदि कर्मयोगी, आदि सहयोगी आणि आदि साथी यांच्या अथक परिश्रमांमुळे पालघर जिल्ह्याने हा राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार पटकावला आहे.
या सन्मानामुळे पालघर जिल्ह्याचा राष्ट्रीय पातळीवरील गौरव वाढला असून, जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख उपक्रमांद्वारे आदिवासी भागांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आता देशभरात आदर्श म्हणून मान्यता मिळवत आहेत.
हा पुरस्कार म्हणजे टीमवर्क, प्रामाणिक सेवा आणि जनहितासाठीच्या समर्पित कार्याचा सन्मान आहे. पालघर जिल्ह्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की सामूहिक प्रयत्न, जबाबदारी आणि जनसेवा या माध्यमातून यश नेहमीच शक्य आहे.
