महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना दिवाळी भेट!४७ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नती — शासनाचा आदेश जारी

मुंबई प्रतिनिधी :- प्रीती गडा

मुंबई, दि. २० ऑक्टोबर २०२५ :
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४७ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट दिली आहे. यामध्ये २३ अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) तर २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. या निर्णयासंदर्भातील शासन आदेश आज, सोमवार (दि. २० ऑक्टोबर) रोजी जारी करण्यात आला.

या पदोन्नतीमुळे अनेक अधिकाऱ्यांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून, त्याचबरोबर भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) प्रवेशाचा मार्गही खुला झाला आहे. महसूल विभाग विविध लोकाभिमुख योजना राबवित असतो आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी महसूल अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पदोन्नतीमुळे प्रशासनात नवचैतन्य येईल व कामकाजाची गती वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नवीन पदावर कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून संबंधित अधिकाऱ्यांना नव्या वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,

“गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. पदोन्नतीमुळे कामाचा उत्साह वाढतो आणि प्रशासन अधिक गतिमान होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक आणि कार्यक्षम शासन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेक अधिकाऱ्यांचा आयएएस होण्याचा मार्ग खुला करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. अखेर या अधिकाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात आम्हाला यश आले.”

या निर्णयामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ही पदोन्नती त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने “दिवाळीची खास भेट” ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button