
वसई, दि. २४ ऑक्टोबर :
उत्तर भारतीय बांधवांचा सर्वात महत्त्वाचा उत्सव छठ पूजा आता वसई-विरार परिसरातही पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करता येणार आहे. यासाठी आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित (वसई) आणि आमदार श्री. राजन नाईक (नालासोपारा) यांनी पुढाकार घेत, नागरिकांची मागणी लक्षात घेऊन समुद्र व तलावावर छठ पूजेची परवानगी मिळवून दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी 27 व 28 ऑक्टोबर रोजी छठ पूजा मोठ्या भक्तिभावाने साजरी होणार आहे. मात्र यंदा नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांवर (समुद्र, तलाव) पूजा करण्यास बंदी असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अनेक श्रद्धाळूंनी महानगरपालिका व आमदारांना विनंती केली की, न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत पर्यावरणपूरक पद्धतीने पूजा करण्यास परवानगी द्यावी.
या पार्श्वभूमीवर आमदार स्नेहा दुबे पंडित आणि आमदार राजन नाईक यांनी पालकमंत्री गणेश नाईक तसेच वसई-विरार महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दोन्ही आमदारांनी हे स्पष्ट केले की, छठ पूजेदरम्यान कोणतीही मूर्ती विसर्जन होत नाही — फक्त सूर्यदेवाला नैसर्गिक पाण्याचा अर्घ्य दिला जातो. तसेच निर्माल्य व पूजा साहित्य वेगळे गोळा करण्यासाठी कलशांची व्यवस्था करून स्वयंसेवकांमार्फत पाण्याचे प्रदूषण रोखले जाईल.
या सामंजस्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक मार्गावर महानगरपालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत पूजेच्या आयोजनासाठी आवश्यक ती परवानगी आणि सोयी-सुविधांची तयारी करण्याचे आश्वासन दिले आहे.
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार स्नेहा दुबे पंडित आणि आमदार राजन नाईक यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे भाविकांना आपल्या परंपरेनुसार श्रद्धा, पर्यावरण आणि प्रशासन या तिन्हींचा समतोल राखत छठ पूजेचा पवित्र उत्सव साजरा करता येणार आहे.