
डहाणू, जि. पालघर :
काटी रोड तीन रस्ता परिसरातील बेकायदेशीर दारू विक्री आणि नरपाड, आंबेवाडी पूल, चिखला गाव परिसरातील बेकायदेशीर वाळू उपशा विरोधात नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. सामाजिक कार्यकर्ते वसीम पठाण यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) आणि डहाणू पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देत दोन्ही गंभीर प्रकारांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, काटी रोड तीन रस्ता परिसरात ‘रेखा’ आणि ‘बेबी’ नावाच्या दोन महिला गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर दारू विक्री करत आहेत. या दारूच्या सेवनामुळे परिसरात भांडण, हिंसाचार, तसेच दोन मृत्यूंच्या घटनाही घडल्या असून, तरीही ही अवैध विक्री आजही सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, नरपाड, आंबेवाडी पूल, चिखला गाव आणि समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात रात्री उशिरा बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचीही माहिती मिळाली आहे. वसीम पठाण यांनी सांगितले की, “या ठिकाणी पिकअप आणि बैलगाड्यांद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू नेली जात आहे. या बेकायदेशीर उपशामुळे समुद्रकिनाऱ्याची धूप आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.”
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, संबंधित ठिकाणी छापे टाकून बेकायदेशीर दारू विक्री आणि वाळू उपशा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच, या दोन्ही ठिकाणांवर कायमस्वरूपी पोलीस गस्त आणि देखरेख ठेवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
