ड्रोन दिसल्याच्या घटनेवर पालघर पोलिसांची सतर्कता – नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पालघर, दि. 26 ऑक्टोबर :
पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मुरबे, सातपाटी, नांदगाव, खारेकुरण आणि आसपासच्या परिसरात 24 ऑक्टोबरच्या रात्री काही नागरिकांनी आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू उडताना पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

या बाबीची दखल घेत पालघर पोलीस दलाने तातडीने चौकशी सुरू केली असून, संबंधित घटनेबाबत सर्व शासकीय विभागांशी समन्वय साधून सखोल शहानिशा केली जात आहे. ड्रोन उडविण्याची परवानगी, हेतू व तांत्रिक तपशील यासंदर्भातही आवश्यक ती माहिती गोळा केली जात आहे.

दरम्यान, पालघर पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. “कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका किंवा त्यावर विश्वास ठेवू नका. संशयास्पद हालचाली किंवा वस्तू दिसल्यास त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क साधा,” असे आवाहन पोलिस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी केले आहे.

देशमुख यांनी पुढे सांगितले की, “या घटनेची सखोल तपासणी सुरू असून आवश्यक ती सर्व कारवाई केली जाईल. नागरिकांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य असून अफवांमुळे अनावश्यक भीती पसरवू नये.”

पालघर पोलिसांकडून या प्रकरणावर पूर्ण लक्ष ठेवण्यात आले असून नागरिकांना जागरूक आणि जबाबदार वर्तन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button