फेब्रुवारी २०२६ मध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे आयोजन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा – भारताच्या नेतृत्वाखाली वातावरणीय कृतीस नवा आयाम

मुंबई प्रतिनिधी

मुंबई, दि. २८ :
भारताचे वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनातील नेतृत्व अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल म्हणून पुढील वर्षी १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ‘मुंबई क्लायमेट वीक’ या जागतिक परिषदेचे आयोजन मुंबईत करण्यात येणार आहे. या उपक्रमाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत केली.

हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांचा सहकार्याने तो पार पडणार आहे. या बैठकीत मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, सचिव जयश्री भोज आणि प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक शिशिर जोशी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुंबई क्लायमेट वीक’ च्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “मुंबई हवामान सप्ताह भारताच्या कृतीशील नेतृत्वाचे प्रतिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून, मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक दक्षिणेसाठी न्याय्य, नाविन्यपूर्ण आणि वित्तीयदृष्ट्या सक्षम अशा हवामान भविष्याची दिशा दाखवतील.”

या परिषदेतील प्रमुख भर अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी सक्षमता या तीन विषयांवर असेल. तीसहून अधिक देशांतील पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासक, आणि धोरणकर्ते या परिषदेत सहभागी होणार आहेत. व्यवहार्य आणि समावेशक हवामान कृती आराखडा तयार करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “आता कृती करण्याची वेळ आली आहे. समाजातील प्रत्येक घटकाने हवामान बदलाविरुद्धच्या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे. ‘मुंबई क्लायमेट वीक’ नंतर महाराष्ट्रासाठी ठोस कृतीधोरण आणि बेंचमार्क निश्चित करावे लागतील.”

या उपक्रमात नागरिकांसाठी कला, चित्रपट, कार्यशाळा, आरोग्य, क्रीडा आणि ‘क्लायमेट फूड फेस्टिव्हल’ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण मुंबईत केले जाणार आहे.

‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक शिशिर जोशी यांनी सांगितले की, “मुंबई क्लायमेट वीक हा भारतासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. लोकसहभागातून शाश्वत आणि समावेशक उपायांची निर्मिती हेच याचे वैशिष्ट्य असेल.”

या परिषदेचे नॉलेज पार्टनर मॉनिटर डिलॉईट असून, क्लायमेट ग्रुप, इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (इंडिया), युनिसेफ, शक्ती फाउंडेशन, रेनमॅटर फाउंडेशन आदी संस्था या उपक्रमात सहभागी होतील.

‘मुंबई क्लायमेट वीक’ हा उपक्रम केवळ मुंबईसाठी नव्हे, तर संपूर्ण भारत आणि विकसनशील राष्ट्रांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचविणारा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button