लोहपुरुष सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त “एकता रॅली”चे आयोजन — राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी युवकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित

पालघर, दि. 31 ऑक्टोबर :
देशाच्या एकात्मतेचा आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त “एकता रॅली (पदयात्रा)” देशभरात आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.00 वाजता “एकता रॅली”चे आयोजन करण्यात आले आहे.

ही रॅली आर्यन मैदानातून प्रारंभ होऊन पाचबत्ती चौकापर्यंत काढण्यात येणार असून, समाजात राष्ट्रीय एकतेचा संदेश दृढ करण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे.

या रॅलीत एन.एस.एस., एन.सी.सी., माय भारत, तसेच शाळा आणि महाविद्यालयांतील युवक-युवतींनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे जिल्हा क्रिडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की,

“एकता रॅली हा केवळ कार्यक्रम नसून देशाच्या ऐक्य, बंधुता आणि अभिमानाचे प्रतीक आहे. युवकांचा सक्रीय सहभागच या रॅलीचे खरे यश ठरेल.”

राष्ट्रीय एकतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून, पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button