वसई परिसरात अखंड आणि सक्षम वीजपुरवठ्याकडे मोठे पाऊल!—- आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित

आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने महावितरण अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

वसई — वसई-विरार परिसरातील नागरिकांना विश्वासार्ह, अखंड आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा या उद्देशाने वसई विधानसभेच्या संघर्षकन्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण (MSEDCL) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक गुरुवारी आमदार सौ. दुबे पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली.

या बैठकीस कल्याण झोनचे मुख्य अभियंता श्री. चंद्रमणी मिश्रा, वसई परिमंडळ अधीक्षक अभियंता श्री. संजय खंदारे, वसई विभाग कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण सुटे, विरार विभाग कार्यकारी अभियंता श्री. उमेश लेले तसेच वसई पूर्व-पश्चिम आणि नालासोपारा पश्चिमचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत वसई-विरार परिसरातील वारंवार होणारे वीज खंड, तांत्रिक अडचणी, औद्योगिक क्षेत्रातील समस्या आणि प्रलंबित विकास कामांवर सविस्तर चर्चा झाली. यापूर्वी आमदार सौ. दुबे पंडित यांनी दिलेल्या सूचनांवर झालेल्या कार्यवाहीचा आढावाही घेण्यात आला.

बैठकीत महावितरणकडून सादर झालेल्या प्रमुख मुद्द्यांमध्ये —

विरार औद्योगिक क्षेत्रातील वीज सुधारणा प्रकल्प: ₹१३५ कोटींचा DPR तयार; मान्यता मिळाल्यानंतर ३-४ महिन्यांत कामाला सुरुवात.

आगाशी स्विचिंग स्टेशन: ₹७.२० कोटींच्या प्रकल्पामुळे परिसरात स्थिर वीजपुरवठा होणार.

अर्नाळा किल्ला व गावातील टॉवर लाईन दुरुस्ती: ₹१.८२ कोटींचे काम प्रस्तावित.

पुरापाडा भागातील कंडक्टर बदल: ६ किमीचे काम पूर्ण; उर्वरित काम गतीमान.

कमान औद्योगिक क्षेत्रासाठी द्विभाजन फीडर योजना: स्थिर आणि विश्वासार्ह वीजपुरवठा सुनिश्चित.

जुन्या कंडक्टरचा बदल: ८ ते १० किमी नवीन बंच्ड कंडक्टर बसविण्याचे काम सुरू.

जुने DTC बदल: ओव्हरलोडेड ट्रान्सफॉर्मर्सची तपासणी व नवीन उच्च क्षमतेच्या DTC ने बदल.

DPDC योजनेंतर्गत प्रलंबित कामांना मंजुरीसाठी समन्वय वाढविण्याचे निर्देश.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व प्रस्तावित कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याची हमी दिली.

बैठकीच्या शेवटी आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित म्हणाल्या,

“वसई-विरार परिसरातील नागरिक आणि उद्योगांना अखंड, विश्वासार्ह वीजपुरवठा देणे हेच माझे ध्येय आहे. वीजपुरवठ्याशी संबंधित प्रत्येक प्रकल्पावर मी स्वतः लक्ष ठेवणार असून, सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मी सतत पाठपुरावा करेन.”

बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली व आभार प्रदर्शनाने समाप्त झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button