पालघर डेपोला नवीन एसटी बसेसची भेट; आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते ७ नव्या बसचे दिमाखदार उद्घाटन

एकूण १७ नवीन बस पालघर डेपोसाठी; प्रवाशांना मिळणार अधिक सुरक्षित, नियमित आणि सुविधाजनक प्रवास सेवा

पालघर | प्रतिनिधी :

पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी देणारी आनंदाची बातमी असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने पालघर एसटी डेपोसाठी एकूण १७ नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात पालघर डेपोच्या ताफ्यात दाखल झालेल्या ७ अत्याधुनिक नवीन एसटी बसेसचे उद्घाटन आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

यावेळी आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते नव्या बसेसचे पूजन करून फीत कापण्यात आली तसेच हिरवा झेंडा दाखवून या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी रवाना करण्यात आल्या. पालघर एसटी आगाराच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाची सोय अधिक सुरक्षित, सुकर आणि वेळेत होण्यास मदत होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला महायुतीचे तसेच प्रशासकीय पातळीवरील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यामध्ये शिवसेना सहसंपर्क प्रमुख व प्रवक्ते केदार काळे, युवासेना प्रमुख साईराज पाटील, पालघर जिल्हा शिवसेना अध्यक्ष कुंदन संखे, विभागीय अधिकारी कल्याणी ढगे मॅडम तसेच यांत्रिकी प्रमुख धारगावकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय एसटी महामंडळाचे विविध अधिकारी व पदाधिकारी, चालक-वाहक, दैनंदिन प्रवासी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवीन बसेसचे स्वागत करत पालघरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मत व्यक्त केले.

पालघर डेपोला एकूण १७ नवीन बसेस मिळणार असून, पहिल्या टप्प्यातील ७ बसेस सेवेत दाखल झाल्या आहेत. उर्वरित १० बसेस देखील लवकरच पालघर डेपोच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे विविध मार्गांवरील वाढती प्रवाशांची संख्या आणि मागणी लक्षात घेऊन बसफेऱ्यांमध्ये वाढ व सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या नवीन बसेसमुळे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, महिला तसेच दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जुन्या बसेसवरील ताण कमी होऊन प्रवाशांना अधिक नियमित, सुरक्षित आणि दर्जेदार प्रवास सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

पालघरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम आणि बळकट करणारा हा निर्णय प्रवाशांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार असून, आगामी काळात उर्वरित १० नवीन बसेसही ताफ्यात दाखल झाल्यानंतर पालघर डेपोची प्रवासी सेवा आणखी सक्षम होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नवीन एसटी बसेसच्या माध्यमातून पालघरच्या प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाला आता अधिक वेग, सुरक्षितता आणि सुविधेची जोड मिळणार असून, या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button