
पालघर | प्रतिनिधी :
वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवत रस्त्यावर बिनधास्तपणे धावणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही! बिना नंबर प्लेटची वाहने, नियमबाह्य व फॅन्सी नंबर प्लेट, वाहनांच्या काचांवरील ब्लॅक फिल्म तसेच कर्कश आणि अनधिकृत सायलेंसर लावून फिरणाऱ्या वाहनचालकांविरोधात पालघर वाहतूक शाखेने धडक मोहीम सुरू केली आहे.
पोलीस अधीक्षक यतीन देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी एपीआय अनिल व्हटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहन तपासणी आणि कारवाईला वेग देण्यात आला आहे.
‘बिना नंबर’ वाहनांवर सर्वाधिक लक्ष
वाहनाची ओळख पटविण्यासाठी नंबर प्लेट अत्यंत महत्त्वाची असताना अनेक दुचाकी व चारचाकी वाहने नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावताना आढळत आहेत. काही वाहनांवर नियमांनुसार नंबर प्लेट न लावता वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या किंवा फॅन्सी पद्धतीने नंबर लिहिलेल्या प्लेट लावण्यात आल्या आहेत.
अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.
ब्लॅक फिल्म लावणाऱ्यांनाही इशारा
वाहनांच्या काचांवर नियमबाह्य पद्धतीने ब्लॅक फिल्म लावून फिरणाऱ्या वाहनचालकांवरही वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहनाच्या आतील भागाची दृश्यता कमी करणाऱ्या अशा नियमबाह्य फिल्ममुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे काचांवर नियमबाह्य फिल्म लावून रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची तपासणी वाढविण्यात आली आहे.
कर्कश सायलेंसरचा ‘आवाज’ आता पोलिसांच्या रडारवर!
विशेषतः दुचाकींमध्ये कंपनीने दिलेल्या सायलेंसरमध्ये बदल करून कर्कश आवाज करणारे किंवा अनधिकृत सायलेंसर बसविण्याचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. रस्त्यावर मोठा आवाज करत वाहन चालविणाऱ्या अशा वाहनचालकांवरही वाहतूक शाखेने लक्ष केंद्रित केले आहे.
मॉडिफिकेशनच्या नावाखाली वाहनाच्या मूळ रचनेत नियमबाह्य बदल करून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांवरही नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
संशयास्पद वाहनांचीही बारकाईने चौकशी
ही मोहीम केवळ दंडात्मक कारवाईपुरती मर्यादित नसून संशयास्पद वाहनांवरही पोलिसांची करडी नजर आहे. बिना नंबर प्लेटची किंवा संशयास्पद स्वरूपाची वाहने गैरप्रकारांसाठी वापरली जाण्याची शक्यता लक्षात घेता अशा वाहनांची ओळख, कागदपत्रे आणि वाहनाची स्थिती तपासली जात आहे.
यामुळे वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासोबतच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीही ही मोहीम महत्त्वाची ठरत आहे.
कागदपत्रे नसतील तर कारवाई अटळ
वाहनचालकांनी वाहन चालविताना आरसी, वैध विमा, पीयूसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसह आवश्यक कागदपत्रे नियमानुसार जवळ ठेवणे गरजेचे आहे. कागदपत्रांची कमतरता आढळल्यास संबंधित वाहनचालकावर नियमानुसार कारवाई केली जात आहे.
ए.पी.आय अनिल व्हटकर यांचा स्पष्ट इशारा
वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी आहे. बिना नंबर प्लेट, नियमबाह्य नंबर प्लेट, ब्लॅक फिल्म, कर्कश अथवा अनधिकृत सायलेंसर आणि इतर नियमबाह्य बदल करून वाहन चालविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे.
मोहीम जिल्हाभर सुरूच राहणार
पालघर जिल्ह्यात वाहतूक शिस्त अधिक मजबूत करण्यासाठी ही कारवाई एका दिवसापुरती मर्यादित नसून सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पोलिसांची कारवाई होण्याची वाट न पाहता आपल्या वाहनाची नंबर प्लेट, काचांवरील फिल्म, सायलेंसर आणि आवश्यक कागदपत्रे नियमांनुसार आहेत की नाहीत, याची तातडीने तपासणी करून घ्यावी.
‘नियम मोडा आणि नंतर दंड भरा’ हा बेफिकीरपणा आता पालघरच्या रस्त्यांवर चालणार नाही. बिना नंबरची वाहने, फॅन्सी नंबर प्लेट, ब्लॅक फिल्म आणि कर्कश सायलेंसरविरोधातील वाहतूक शाखेची मोहीम आगामी काळात आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत.
पालघर ट्रॅफिकचा संदेश स्पष्ट — नियम पाळा, सुरक्षित चला; अन्यथा कारवाईला सामोरे जा!